पुणेरी टाइम्स टीम…दौंड दौंड नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांना मोठा धक्का बसला असून शहराध्यक्षांच्या पत्नीचा दारुण पराभव झाला आहे. नगरसेविका रुचिता रुपेश कटारिया यांनी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट गुरुमुख नारंग यांच्या पत्नी कविता गुरुमुख नारंग यांचा दारुण पराभव सध्या दौंडच्या राजकीय वर्तुळात तीव्र चर्चेचा विषय ठरत आहे. हा पराभव केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नसून, शहरातील सत्तासमीकरणे आणि नेतृत्वाच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा मानला जात आहे.
एकेकाळी दौंड शहराच्या राजकारणात दबदबा असलेले शहराध्यक्ष गुरुमुख नारंग यांनी दिग्गज नेते इंद्रजित जगदाळे यांचा पराभव करून आपले राजकीय वजन सिद्ध केले होते. त्या विजयामुळे नारंग यांची शहरातील पकड भक्कम मानली जात होती. मात्र, त्याच परंपरेला छेद देणारा निकाल यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाला. शहराध्यक्षपदाची सूत्रे हातात असतानाही त्यांच्या कुटुंबातील उमेदवाराला मतदारांनी सपशेल नाकारल्याचे चित्र समोर आले आहे.
विजयी उमेदवार रुचिता कटारिया या ‘नागरिक हित संरक्षण मंडळा’चे सर्वेसर्वा प्रेमसुख कटारिया यांच्या सून असून, त्यांचे पती रुपेश कटारिया हे आमदार राहुल कुल यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. रुपेश कटारिया यांचे दौंडमधील व्यापारी वर्गाशी घनिष्ठ संबंध असून, त्याच नेटवर्कचा राजकीय लाभ त्यांना मिळाल्याची चर्चा नेहमीच रंगत आली आहे. मात्र, या निवडणुकीत व्यापारी संबंध, पक्षीय ताकद आणि सत्तेचा प्रभाव हे घटक मतदारांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, अजित पवार गटाकडून शहराध्यक्ष पदाचा प्रभाव वापरून निवडणूक ‘सुरळीत’ होईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्षात मतदारांनी वेगळाच संदेश दिला. सत्तास्थान, ओळखी आणि अंतर्गत युती यापेक्षा स्थानिक प्रश्न, नाराजी आणि नेतृत्वावरचा विश्वास अधिक महत्त्वाचा ठरला, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
या निकालामुळे अजित पवार गटाच्या शहरस्तरीय संघटनात्मक ताकदीवर प्रश्न उपस्थित झाले असून, “खरंच शहराध्यक्षांचे राजकीय वजन किती?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पराभव इशाराच मानला जात असून, अंतर्गत असंतोष, चुकीची उमेदवार निवड आणि जमिनीवरील कार्यकर्त्यांशी तुटलेला संवाद याचे हे द्योतक असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
एकूणच, दौंड नगरपालिकेच्या या निकालाने सत्तेच्या गर्वाला मतदारांनी ठेच दिली असून, राजकारणात नाव, पद किंवा ओळख नव्हे तर प्रत्यक्ष काम आणि जनतेशी नाळ जोडलेली असणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


