पुणेरी टाइम्स दौंड : तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर दौंड पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले चांगलेच ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळाले. पंचायत समिती अंतर्गत असलेल्या रोजगार हमी कक्षाचा सविस्तर आढावा घेत, कामकाजातील त्रुटींवर त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी सभापतींनी प्रलंबित कामे, निधीचा वापर, लाभार्थ्यांना मिळणारे प्रत्यक्ष फायदे, तसेच कामांच्या दर्जाबाबत सखोल माहिती घेतली. अनेक ठिकाणी कामे अपूर्ण, निकृष्ट दर्जाची आणि विलंबाने सुरू असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे.
“शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना त्रास होणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. कामांमध्ये कोणतीही ढिलाई चालणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला. तसेच, मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश देत, पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामात हलगर्जीपणा किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी सभापती सुखदेव चोरमले यांच्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मनरेगा कक्षातील परिस्थिती बदलण्याच्या दिशेने असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.


