पुणेरी टाइम्स टीम-दौंड : पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले यांनी मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) कामांबाबत कडक भूमिका घेत ॲक्शन मोड सुरू केला आहे. मनरेगा विभागातील ढिसाळ कारभार, विलंब आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत थेट अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.
सभापती चोरमले यांच्या धडाकेबाज हस्तक्षेपामुळे मनरेगा यंत्रणा आता “सुतासारखी सरळ” होताना दिसत आहे. प्रलंबित प्रस्तावांना गती देणे, कामांची तातडीने मोजणी, मंजुरी प्रक्रिया जलद करणे आणि लाभार्थ्यांना वेळेत मजुरी मिळावी यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत असून शेतकरी व कामगार वर्गात समाधानाचे वातावरण आहे. भ्रष्टाचार किंवा दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत चोरमले यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे येत्या काळात मनरेगा अंतर्गत कामांचा दर्जा सुधारणार आणि ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीला चालना मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


