पुणेरी टाइम्स टीम (बारामती) – बारामतीचे सुपुत्र आणि समाजहितासाठी झटणारे कार्यकर्ते शिवश्री ॲड. प्रशांत (बापू) पवार यांची सामाजिक मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली असून, त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
प्रशांत (बापू) पवार हे बारामती येथील वकील असून, समाजकारण आणि प्रबोधन चळवळीशी त्यांचा अनेक वर्षांचा संबंध आहे. समाजातील अन्याय, विषमता आणि असमानतेविरोधात त्यांनी विविध पातळ्यांवर तीव्र व प्रखर आंदोलने केली आहेत. बारामती परिसरात शैक्षणिक, सामाजिक व युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी केलेल्या लढ्यामुळे ते “जनतेचा आवाज” म्हणून ओळखले जातात.
चळवळीतील कार्यकर्ता म्हणून सुरुवात करून त्यांनी आज केंद्रीय पातळीवरील नेतृत्वापर्यंतचा प्रवास गाठला आहे. या प्रवासात त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या विचारसरणीचा प्रसार, इतिहास जागृती, आणि युवकांना संघटित करण्यासाठी अविरत परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या निवडीनंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांच्या सोबत बोलताना म्हटले आहे की, “ॲड. प्रशांत (बापू) पवार यांच्या नेतृत्वामुळे संभाजी ब्रिगेडच्या चळवळीला नवे बळ आणि दिशा मिळेल.”



