पुणेरी टाइम्स टीम… दौंड तालुक्यातील खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषद गट आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलाच तापला असून, या गटातून आमदार राहुल कुल यांचा कट्टर कार्यकर्ता व युवा नेता अमरसिंह परदेशी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मलठण गावातील समाजकार्यातून पुढे आलेले अमरसिंह परदेशी यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत.
अमरसिंह परदेशी यांच्या मातोश्री पारूबाई परदेशी या सध्या आमदार राहुल कुल गटाच्या मलठण गावच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यामुळे परदेशी कुटुंबाचा थेट ग्रामपातळीवरील प्रभाव आणि आमदार कुल यांच्याशी असलेली जवळीक लक्षात घेता, या निर्णयाकडे तालुक्यातील सर्व राजकीय गटांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, याच जिल्हा परिषद गटातून माजी आमदार जगदाळे यांचे सुपुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल (बाबा) जगदाळे हे देखील निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे जगदाळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे या गटात कुल विरुद्ध पवार गटाची अप्रत्यक्ष लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
अमरसिंह परदेशी यांना कोणताही मोठा राजकीय वारसा नसतानाही, समाजकार्यातून उभे राहिलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे. विशेषतः महिला वर्गामध्ये अमरसिंह परदेशी यांच्या नावाची मोठी चर्चा आणि सकारात्मक वाहवा सुरू असल्याने त्यांच्या उमेदवारीला एक वेगळी ताकद मिळत असल्याचे बोलले जात आहे.
युवा नेतृत्व, ग्रामपातळीवरील संघटन, महिला मतदारांचा वाढता पाठिंबा आणि आमदार राहुल कुल यांची संभाव्य साथ या सर्व बाबी एकत्र आल्यास खडकी–देऊळगाव राजे गटात राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आता या सगळ्या घडामोडींमध्ये आमदार राहुल कुल नेमकी कोणती भूमिका घेणार? अमरसिंह परदेशी यांना अधिकृत पाठिंबा देणार की राजकीय डावपेच आखणार? याकडे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. एक मात्र निश्चित — या जिल्हा परिषद गटात यावेळी लढत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची ठरणार आहे.



