पुणेरी टाइम्स टीम…दौंड मतदारसंघातील प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी अखेर भगव्या विचारांचा विजय झाला आहे. हिंदू संस्कृती, परंपरा आणि श्रद्धास्थानांचा सन्मान राखत आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केलेल्या आक्रमक आणि ठाम पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने राहू येथील श्री शंभू महादेव मंदिर, कुसेगावचे भानोबा देवस्थान आणि नारायण बेट (देऊळगाव गाडा) या पवित्र स्थळांना ‘ब’ वर्ग दर्जा देत प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.
विधानसभेतील ‘अर्धा तास चर्चे’च्या माध्यमातून कुल यांनी दौंडच्या तीर्थक्षेत्रांचा प्रश्न केवळ मांडला नाही, तर तो ठामपणे लढवला. हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानांचा विकास हा केवळ राजकीय विषय नसून तो संस्कृतीच्या जतनाचा प्रश्न आहे, हे त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडले.
यावेळी त्यांनी केवळ तीन देवस्थानांपुरते मर्यादित न राहता केडगावचे पद्मावती माता मंदिर, रोटीचे रोटमलनाथ मंदिर आणि राजेगावचे राजेश्वर मंदिर यांच्याही विकासासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली. हिंदू आस्थेच्या प्रत्येक केंद्राला न्याय मिळालाच पाहिजे, ही त्यांची भूमिका ठाम राहिली.
प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले की, राहू, कुसेगाव आणि नारायण बेट या देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याबाबतच्या प्रस्तावातील त्रुटी तातडीने दूर करण्यात येतील आणि प्रत्येक ठिकाणी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. तसेच नारायण बेट येथील वनक्षेत्र आणि भाविकांच्या संख्येच्या दाखल्यासंबंधी तांत्रिक बाबी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
हिंदू समाजासाठी हा क्षण अभिमानाचा आहे. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या तीर्थक्षेत्रांना आता विकासाची नवी दिशा मिळणार आहे. रस्ते, पाणी, भक्तनिवास आणि इतर पायाभूत सुविधा उभारून भाविकांना सुसज्ज वातावरण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



