पुणेरी टाइम्स टीम | हिंगणीगाडा (ता. दौंड) परिसरात दिवसा ढवळ्या सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरूम उत्खननाने गंभीर वळण घेतले असून, संबंधित मंडलाधिकारी व महसूल अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरविल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा सुरू असून, आतापर्यंत सुमारे १० हजार ब्रास मुरूम काढण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. स्थानिकांच्या आरोपानुसार, संबंधित मुरूम माफियाला पाटस मंडळ अधिकारी यांची मूकसंमती असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन शक्य नसल्याचे बोलले जात आहे. महसूल विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या या क्षेत्रात नियमबाह्य काम सुरू असतानाही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. या मुरुम उत्खनन बाबत मंडळ अधिकारी पाटस यांना विचारणा केली असता माहिती घेवुन सांगितले जाईल एवढेच बेजबाबदारपणे सांगण्यात आले. त्यामुळे या उत्खननाला मंडळ अधिकारी यांचा आशिर्वाद असल्याचे दिसून येत आहे.
गौण खनिज निधीला मोठा फटका – या बेकायदेशीर उत्खननामुळे शासनाच्या गौण खनिज महसूल निधीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. नियमानुसार रॉयल्टी आणि दंड आकारणी झाली असती तर शासनाच्या तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल जमा झाला असता. मात्र, प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेमुळे हा महसूल थेट माफियांच्या घशात गेल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसुलीची मागणी – गावकऱ्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच शासनाचे झालेले नुकसान संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करावे, अशी ठाम मागणी केली आहे. “कामचुकारपणा की संगनमत?” असा सवाल उपस्थित होत असून, वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
वरिष्ठांची भूमिका काय? – सध्या या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नियमबाह्य उत्खननावर कठोर कारवाई होणार की पुन्हा एकदा ‘कागदी घोडे’ नाचवले जाणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.



