पुणेरी टाइम्स टीम…(दौंड) आमदार ॲड. राहुल कुल यांच्या राहू येथील संपर्क कार्यालयात पत्रकार बांधवांसाठी आयोजित दिवाळी फराळ व संवाद बैठक उत्साहात संपन्न झाली आहे. या कार्यक्रमात दौंड तालुका व परिसरातील विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, संपादक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आमदार कुल यांचे स्वीय सहाय्यक ‘ओंकार थोरात’ यांनी केले होते.
बैठकीदरम्यान पत्रकार बांधवांशी संवाद साधताना आमदार ॲड. राहुल कूल यांनी स्थानिक विकासकामे, जनतेच्या समस्या, तसेच प्रशासनाशी समन्वय साधून होत असलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच त्यांनी माध्यम प्रतिनिधींच्या कार्याचे कौतुकही करताना सांगितले की “पत्रकार हे समाजाचे सजग प्रहरी आहेत. त्यांच्या सूचनांमुळे आणि प्रश्नांमुळे जनतेच्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे समजतात आणि विकासाचा वेग वाढतो.” यानंतर उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार बांधवांसाठी पारंपरिक दिवाळी फराळ आयोजित करण्यात आले होते. आनंदी, आपुलकीच्या वातावरणात संवाद आणि चर्चासत्र रंगले, या प्रसंगी दौंड तालुक्यातील विविध माध्यमांचे प्रतिनिधी, स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार थोरात यांनी केले उपस्थितांचे आभार संदीप सोनवणे यांनी मानले.



