पुणेरी टाइम्स टीम… (दौंड)दौंडकरांसाठी आनंदाची बातमी! आमदार ॲड.राहुलदादा कुल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मागणीमुळे अखेर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस या जलदगती गाडीचा दौंड स्थानकावर थांबा रेल्वे बोर्डाने मंजूर केला आहे. या निर्णयामुळे दौंड आणि परिसरातील हजारो प्रवाशांच्या सोयीसाठी नवा मार्ग खुला झाला आहे. पुणे-सोलापूर-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी दौंड हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून, येथून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी विविध दिशांना प्रवास करतात.
या मागणीसाठी आमदार ॲड. कुल यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव आणि तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने निवेदने दिली, बैठका घेतल्या आणि दौंड स्थानकाच्या वाढत्या प्रवासी संख्येचे सविस्तर सादरीकरण केले होते. त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, रेल्वे बोर्डाने या बहुप्रतीक्षित मागणीस मान्यता दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयासाठी आमदार कुल यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव, आणि रेल्वे बोर्ड यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. “दौंड आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय अत्यंत मोलाचा आहे.
या निर्णयामुळे दौंडचे रेल्वे नकाशावरील स्थान अधिक बळकट होईल आणि प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आधुनिक सेवेचा लाभ मिळेल,”असं आमदार ॲड. राहुल कुल यांनी सांगितलं आहे.



