पुणेरी टाइम्स टीम (दौंड)-दौंड पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकार्याच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित अधिकारी नागरिकांशी गैरवर्तन, व्यापाऱ्यांवर दबाव, तसेच “वसुली”च्या स्वरूपातील हालचाली यांसाठी चर्चेत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, दौंड शहरातील काही व्यापारी, वाहनधारक आणि व्यावसायिक यांच्याकडून या अधिकार्याविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत. विनाकारण नोटीस, दंड आणि चौकशांच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत. या प्रकरणात स्थानिक प्रशासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी पोहोचल्या असल्या तरी, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट संबंधित अधिकाऱ्याला पाठराखण मिळत असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “सामान्य जनतेला भयमुक्त वातावरण मिळावे, ही अपेक्षा असते. मात्र काही अधिकारी स्वतःच्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन करत आहेत.” या प्रकारामुळे दौंड पोलीस ठाण्याच्या प्रतिमेला धक्का बसला असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशीद्वारे संबंधित अधिकार्याला जबाबदार धरण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून जनतेचा विश्वास परत मिळवावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.



