“बोरीबेल येथील ‘लाइफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’वर प्रश्नचिन्ह! शेतकऱ्यांच्या जमिनींवर उभं राहिलंय साम्राज्य? परवानग्यांचा खेळ की प्रशासनाची डोळेझाक?”वाचा सविस्तर नक्की प्रकरण काय आहे…
पुणेरी टाइम्स टीम… दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे उभारण्यात आलेल्या लाइफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर (एलटीसी) या भव्य प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय परवानग्या मिळवताना शासकीय यंत्रणांचा गैरवापर झाला का, असा सवाल स्थानिक नागरिक आणि शेतकरी उपस्थित करत आहेत.
स्थानिकांच्या मते, एवढ्या मोठ्या प्रमाणात उभारलेले बांधकाम करताना अनेक नियम व परवानग्यांची पूर्तता आवश्यक असते. मात्र काही परवानग्या नसतानाही हे बांधकाम उभे राहिल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. त्यामुळे दौंडचे तहसीलदार, दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांना या घडामोडींची माहिती नव्हती का? की प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केली? असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी देशाचे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान, तसेच विविध राजकीय पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणारे मंत्रीच अशा वादग्रस्त प्रकल्पाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांचे कोणतेही ठोस हित साधले गेले नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकीय पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात, हा देखील चर्चेचा विषय ठरत आहे. काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेतजमिनी कमी किमतीत घेऊन त्यावर मोठा प्रकल्प उभा करणे आणि त्याला राजकीय पाठबळ मिळणे ही लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असल्याचे जाहिरातीत नमूद असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे हित नसल्याने त्यांची उपस्थिती निश्चित झाली आहे का, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय रंग अधिक गडद होत असल्याची चर्चा सुरू आहे.
आता या प्रकरणात प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, बांधकामाच्या सर्व परवानग्या तपासल्या जाणार का, आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींवर, चर्चा यावर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष लागले आहे….
टीप – सदरील फोटो तांत्रिक AI निर्मित आहे…



