पुणेरी टाइम्स टीम…दौंड तालुक्याच्या ग्रामविकास कार्याला आता नवी दिशा आणि गती मिळणार आहे. पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी तब्बल १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यामुळे दौंड तालुक्यातील ग्रामविकास व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात मोठी सोय होणार आहे. ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे यांनी या इमारतीसाठीचा पहिला टप्पा म्हणून १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयानंतर आमदार राहुल कुल यांनी त्यांची भेट घेऊन मनःपूर्वक आभार मानले.
दोन एकर जागेत उभारणार आधुनिक इमारत- ही नवीन इमारत उपविभागीय अधिकारी (प्रांत) आणि तहसीलदार कार्यालयाच्या परिसरातील सुमारे २ एकर जागेत उभारली जाणार आहे. इमारतीत पंचायत समितीचे सर्व विभाग, सभागृह, नागरिकांसाठी सुविधा केंद्र, तसेच अधिकारी-कर्मचार्यांसाठी आवश्यक कार्यालयीन जागा असणार आहे. प्रशासनाच्या दृष्टीने ही इमारत केवळ आधुनिकच नव्हे, तर डिजिटल आणि पर्यावरणपूरक असेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आमदार राहुल कुल यांचा समाधान व्यक्त- या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार राहुल कुल यांनी सांगितले “दौंड तालुक्याच्या सर्व नागरिकांसाठी ही अत्यंत समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे. पंचायत समितीच्या नव्या इमारतीमुळे ग्रामीण भागातील विकास योजनांची अंमलबजावणी अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने होईल. आधुनिक सुविधा असलेली ही इमारत ग्रामविकास प्रशासनासाठी एक नवा टप्पा ठरेल.”त्यांनी पुढे सांगितले की, “या इमारतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे दैनंदिन कामकाज अधिक वेगाने आणि नागरिकाभिमुख पद्धतीने पार पडेल. यासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
दुसऱ्या टप्प्यात अधिकारी निवासस्थाने- पहिल्या टप्प्यातील इमारतीसाठी निधी मंजूर झाला असला तरी, दुसऱ्या टप्प्यात अधिकारी निवासस्थाने व उर्वरित बांधकामासाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. हा प्रस्तावही लवकरच मंजूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्रामविकास कामकाजाला मिळणार गती- या इमारतीमुळे दौंड तालुक्यातील प्रशासकीय कामकाज केवळ एका छताखाली उपलब्ध होणार नाही, तर गावागावांमधील विकास योजनांच्या अंमलबजावणीला नवचैतन्य मिळेल. नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांची धावपळ न करता सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. दौंड तालुक्याच्या प्रशासकीय क्षमतेत वाढ घडविणारा हा निर्णय विकासाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. ग्रामविकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात याच इमारतीतून होणार असून, तालुक्यातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



