पुणेरी टाइम्स टीम…दौंड तालुक्यातील वाळू तस्करी आणि त्यावरून झालेल्या रक्तरंजित घटनांचे पडसाद अजूनही शांत झालेले नाहीत. याच दौंड तालुक्यात अनेक मुडदे याच काळ्या सोन्यामुळे पडलेले आहेत. अशात आता वासुंदे परिसरातील दगड खाणी व स्टोन क्रशरवरून निर्माण झालेली दहशत पुन्हा एकदा तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. स्थानिकांमध्ये सुरू झालेल्या चर्चांनुसार, मागील दोन ते चार दिवसांत येथील एका स्टोन क्रशरवर राडा घडल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणात गुंडगिरीचा स्पष्ट वास येत आहे.
काय सुरू आहे वासुंदे परिसरात? – परिसरातील काही दगडखाणी व स्टोन क्रशरमध्ये आर्थिक व्यवहार, वाहतूक नियंत्रण, वर्चस्वाच्या राजकारणावरून तणाव वाढत असल्याच्या चर्चा गावकऱ्यांत रंगू लागल्या आहेत. रात्रीच्या वेळी संशयास्पद वाहनांची हालचाल, काही अनोळखी व्यक्तींची वर्दळ आणि दबाव टाकण्याचे प्रकार वाढल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्टोन क्रशरवरील अलीकडचा राडा – लोक भयभीत – स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका स्टोन क्रशरवर झालेल्या वादातून राडा झाला. यात शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. जरी अधिकृत तक्रार पुढे आली नसली तरी परिसरात या प्रकरणाचे पडसाद अजूनही जाणवत आहेत. “येथील दगडखाणींमध्ये कोणाचे वर्चस्व? कोणाचा दबाव? यावरून काही मंडळींमध्ये तणाव सुरू आहे,” असे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे.
काळं सोनं… आणि वाढती दादागिरी – दगड खाणींमधून होणारा मोठा आर्थिक फायदा, वाहतूक नियंत्रण आणि कंत्राटांवरील पकड हेच वादाचे प्रमुख कारण असल्याचे चित्र आहे. काही गटांनी या व्यवसायात दादागिरी निर्माण केल्याची चर्चा असून त्यामुळे सामान्य कामगार, चालक व स्थानिक व्यावसायिक भयभीत आहेत.
पोलिस अधीक्षक यांनीच लक्ष देण्याची गरज –अशा घटनांनी तालुक्यातील शांततेला बाधा होऊ शकते. त्यामुळे वासुंदे परिसरातील कारवाया, खाणींची पाहणी, परवान्यांची पडताळणी, रात्रीची गस्त वाढवणे आणि संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करणे अत्यावश्यक झालं आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा या भागात आगामी काळात मोठे कांड घाडल्या शिवाय राहणार नाही. या माफीयांना कोणाचाही वचक आणि आवर नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की — “राडे, दहशत, वाद… हे थांबले नाहीत तर मोठी घटना घडू शकते. पोलीसांनी वेळेत हस्तक्षेप केला पाहिजे
कायदा-सुव्यवस्थेला आव्हान? – दौंड तालुक्यात दगड खाणी आणि वाहतूक यांवरून निर्माण होणारे वाद गेल्या काही महिन्यांत वाढत चालले आहेत. शासन व पोलिसांनी तत्काळ योग्य उपाययोजना न केल्यास ही स्थिती आणखी गंभीर बनू शकते. काही प्रकरणांमध्ये तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींचे नावही वापरून काही खाणधारक दमबाजी करत आहेत. आणि यंत्रणेचा गैरवापर करण्यासाठी लोक प्रतिनिधी यांचा नावाचा होणारा गैरवापर स्वाभिमानी दौंड करांच्या मनात ‘काटेरी घर’ करीत आहे.



