पुणेरी टाइम्स टीम…खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषद गटात सध्या निवडणुकीचे वातावरण तापले असून, अमर परदेशी यांना मिळणारा वाढता पाठिंबा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. गावोगावी, चौकाचौकात आणि चहाच्या टपऱ्यांवर “कोण बाबा आणि कोण आप्पा?” अशा प्रश्नांवर जोरदार राजकीय चर्चा रंगत आहेत. मतदारांमध्ये उत्सुकता वाढली असतानाच, स्थानिक नेतृत्व आणि बाहेरून आलेले उमेदवार यातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की एरवी मतदारसंघात क्वचितच फिरकणारे नेते आता अचानक सक्रिय झाले आहेत. “गाडीची काचसुद्धा खाली येत नाही, साधी ओळखही देत नाहीत, कोणताही कार्यकर्त्याच्या सुख दुःखात सहभागी नसतात, पण निवडणूक आली की मतांसाठी दारात येतात,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक मतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळेच ‘फक्त निवडणुकीपुरते नेते’ असा ठपका काही उमेदवारांवर ठेवला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विरधवल जगदाळे आणि भाजपाचे उमेदवार आप्पासाहेब पवार या दोन्ही कुटुंबांना राजकीय वारसा लाभलेला आहे. मात्र याच वारशावरून सामान्य मतदारांमध्ये नाराजीचा सूरही उमटताना दिसतो. “नेहमीच आमच्याच सतरंज्या आम्ही उचलायच्या का?” असा थेट सवाल मतदारांकडून उपस्थित केला जात आहे. राजकीय घराण्यांच्या परंपरागत वर्चस्वाला छेद देण्याची मानसिकता मतदारांमध्ये तयार होत असल्याचे चित्र आहे.
यात भर म्हणजे, दोन्ही प्रमुख उमेदवार ‘आयात’ असल्याची भावना पक्की होत चालल्याने विरोध आणखी वाढत आहे. स्थानिक भूमिपुत्रांना संधी न देता बाहेरून आलेल्या उमेदवारांना पुढे केल्याने, गटातील अनेक कार्यकर्ते आणि मतदार नाराज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमर परदेशी यांना स्थानिक चेहरा आणि कार्यकर्ता म्हणून मिळणारा वाढता पाठिंबा महत्त्वाचा मानला जात आहे.
एकूणच, खडकी–देऊळगाव राजे गटात यंदाची निवडणूक ही केवळ पक्षीय लढत न राहता, ‘स्थानिक विरुद्ध आयात’ असा संघर्ष ठरत असल्याचे चित्र आहे. मतदारांचा रोष, चौकाचौकातील चर्चा आणि अमर परदेशींना मिळणारा वाढता पाठिंबा यामुळे या गटातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. चौकाचौकात राजकारण तापले दिसून येत असून”अमर परदेशींच्या” वाढत्या पाठिंब्याने घराणेशाही अडचणीत येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत येथे राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार, हे मात्र निश्चित…



