पुणेरी टाइम्स टीम….दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कुरकुंभ पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार स्वप्निल शितोळे यांनी अचानक माघार घेतल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्यामुळे दौंड तालुक्यात राष्ट्रवादीची मोठी नामुष्की झाल्याचे बोलले जात असून पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
दरम्यान, या माघारीमुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता असून भाजपसाठी येथील लढत अधिक सुकर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कुरकुंभ गणात आता भाजपची ताकद वाढण्याची शक्यता असून राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दौंड तालुक्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले असून कुरकुंभ गणातील पुढील काही दिवसांत आणखी मोठे राजकीय निर्णय आणि हालचाली पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



